28 December 2010

आयुष्य झेलताना

जीवनाची गुंतागुंत
पदराची गाठ सुटेना,
अगणित चांदण्या जशा
मोजता येईना.

रहाण्याचा जगण्याचा
विचार करता येइना,
सत्य असत्य पाप पुण्य
भेदच काही कळेना.


जीवनाचा चढ-उतार
जखमा पेलता येईना,
वाट पळवाटा काढत
पुढचे पाऊल सुचेना.


जगण्याचे मर्म
अद्यापि कळेना,
जीवासाठी पोट कि पोटासाठी जीव
आतड्यांनाही कळेना.


खोलवर विचारातून
अर्थ कशाचा समजेना,
प्रत्येक दिवस जगून
क्षण मोजता येईना.


पाषाणातूनच शिल्प
आकार देता येईना,
जीवनाचे गूढ
भेदता येईना.


भाग्यालिखित, विधिलिखित
बदलता येईना,
नियतीने बनवलेले खेळणे
मोडता येईना.


हास्याचे असंख्य तुषार
झेलता येईना,
अश्रुंचे अपार मोती
टिपता येईना.


कमावले किती, गमावले किती?
हिशोबच करता येईना,
बेरीज वजाबाकी करताना
समीकरण सुटेना.


स्वप्नाची आशा आशेचे जीवन
किरण शोधता येईना,
किरण मिळाल्यावर
त्याला थांबवता येईना.


अगणित नातीगोती
खर नात कळेना,
प्रवासांती विश्वासाचा धागा
जुळता जुळेना.


पुढचे पाऊल टाकले
वाट पुढची दिसेना,
जीवनासाठी जगण्यात
आयुष्य वेचता येईना.

Everyone has a different experience in life.
Some take it lightly, while some are more affected by them.
They may setback some, but others see them as a challenge.
However, the same person may have ups and downs in their own attitude, and may start doubting what is the correct way to 'face' the struggles.

Is it wrong to sit down and think about what life has given,
or must one keep ignoring & only keep looking for what's next.

They say that if life gives lemon- make lemonade,
but one may pause to take stock of what life has given,
Its no life to only keep running, as the 'present' will not come again.

27 December 2010

साथ

आयुष्यात फक्त तुझी
साथच हवी आहे,
सुखदुःखाचे ओझे पेलताना
तुझा खांदा हवा आहे.


Togetherness is a gift that only the chosen few will appreciate.
Sometimes it takes a period of seperation, to become aware of the 'special' person in our life that we often take foregranted.



आयुष्याच्या या  वळणावर
तुझी सोबत हवी आहे,
क्षणोक्षणी जीवन जगताना
हृदयाला तुझी गरज आहे.


ऊनसावल्यांचा खेळ खेळताना
तूझा हात हवा आहे,
हारताना जिंकताना
तूच भागीदार हवा आहे.


जग खुप मोठे आहे
माझे विश्व छोटे आहे,
तू आणि तुझी सावली
माझ सर्वस्व  आहे.

21 December 2010

वाट पाहताना

अश्रुंना वाट देत ओठ मुकेच राहिले,
पाणावलेल्या नयनांना अलगद सरकू दिले.


हृदयाच्या ठोक्यांना  मनाच्या भावविश्वाने हरवले,
गुंतागुंत वाढत जाऊन नवीन कोष बनले.


न बोललेले संभाषण अपूर्ण राहिले,
समजून न घेता उगाच तुझ्यावर रागावले.


नजरेसमोर तू नसताना तुला शोधत राहिले,
तुझ्या विचाराने मनही स्वता:ला विसरले.


पाखरांना निरोप दिला तेही तसेच परतले,
लवकर भेटशील या आशेने मी स्वता:ला सावरले.

You went away in search of a bright future,
but left me with your memories.
I know we shall meet soon,
but the seperation seems very long.
My eyes long to see you, come back soon.

18 December 2010

जीवनाचा टप्पा

वय पुढे सरकताना
जगण्याची जाणीव होते,
अर्धशतक ओलांडताना
सावरासावरीची वेळ येते.
 
पालापाचोळा गोळा करताना
नवीन पालवी दिसते,
क्षणभर का होईना
मन आशेने भरते.


मी-माझा  करत
रहाटगाडगे पुढे जाते,
हुतुतू खेळ खेळत
नवीन टप्पा शोधते.


मनाला कितीही आवरले
तरी पुन्हा पुन्हा हरवते,
त्याला बंधन घालताना
जीवनाची घडी चुरगळते.


स्वताःचा शोध घेत
जीवन दिशा ठरवते,
अनुभवातून शिकून
मन परिपक्व बनते.

The woods are lovely, dark and deep,
But I have promises to keep,
And miles to go before I sleep...

12 December 2010

श्वास

श्वासासोबतचा तुझा सहवास
जीवनातील अतूट बंधन,
शेवटच्या क्षणापर्यंतची सोबत
आणि अशी तू अबोल का?


जगणे, मरणे केवळ तुझ्यासाठी
माझे हसू आणि रडू तुझ्यासाठी,
फक्त तुझ्यासाठी श्वास घेतोय
आणि अशी तू अबोल का?


माझ्या सुखदु:खाची सोबतीण
माझ्या सर्वस्वाची तू राणी,
अनंतकाळाची माझी सावली
आणि अशी तू अबोल का?


चंदनासारखे सर्वांसाठी झिजलीस
प्रत्येक क्षणाला साथ दिलीस,
ऋणानुबंध हा अलगद तोडून
अशी तू अबोल का?


तुझ्याविना श्वास माझाही थांबणार
तुझ्याबरोबर मीही संपणार
माझ्या प्रेमाची शपथ तुला
अशी तू अबोल का?


A husband and wife's loving relation is deeply reflected in this emotional poetry. It is said that their hearts are so connected that if one is dying, the other also stops beating.
The pain is unbearable and suddenly there seems to be no meaning in life.
The promises to live together for eternity, appears to have an end.
The heart is yearning to hear only a few words from the beloved & the silence speaks for the inseperable souls.

07 December 2010

क्षितिज शोधताना

दूर एका क्षितिजाचे
स्वप्न बाळगले मनी,
सागराच्या लहरीसरशी
गेले वाळूत विरुनी.



भावनांच्या बंधनात जखडले
मोहाच्या पाशांनी,
मनाच्या कल्पकतेच्या तालावर
गेले अस्तित्व विसरुनी.



वाटेवरच्या खाचखळगा
आपोआप गेल्या हरवूनी,
संघर्ष्याच्या वाटेवरुनी
क्षितीज लपले दुरुनी.



संवेदना लहरी स्तब्ध
झाली सर्व अंगानी,
दूर तारकांचे जाळे
हसले मला वेडावुनी.



अस्तित्व टिकवण्याचे स्वप्न
तसेच राहिले मनी,
दुसऱ्याच्या सर्वस्वात
चित्त गेले हरवूनी.



स्वप्नही डगमगले कधीच
दिशाही गेली सोडूनी,
माती मातीच राहिली
न आले शिल्प घडुनी.


I was chasing a beautiful dream,
Like the waves of the ocean, they rise & go back into the sea!
The mind still runs after this dream,
knowingly that it will go back into the dust.
Sometimes we dont know what we want to achieve,
We keep running after the time, but
it catches us before we can!

04 December 2010

विरोधाभास

नको असलेलं प्रतिबिंब
सतत दृष्टीसमोर का सरकतं?
नको असलेले  विचारांचे वादळ
सतत मनाला का हेलकावत?


खरच सुखाची व्याख्या कशी
नेमक ते काय असतं?
सुख आणि सुखी समिकरणाचा
विरोधाभास असतो.


स्वछंद  उडणाऱ्या पक्ष्यालाही
अनिश्चिततेच भान असतं,
प्रत्येक क्षणी धाडस
माणसाला पेलवाव लागतं.


जगा आणि जगु दया
गणित साधच असतं,
जीवनाचं मोल हे
वेळ गेल्यावर कळत.

Ever wondered why the mind wanders when you want it to concentrate or focus ......be it studies, an exam or simply trying to complete a project?

Sometimes you want to forget a memory & it keeps coming back.
We often stay busy with things that do not matter at all,
and doing so forget that life is passing by, children are growing up....loved ones are leaving us....wish we had given more time to them earlier.

Is there happiness at the end of the journey?
Maybe happiness is hidden 'in' the journey of life- always there, but wanting to be searched.

03 December 2010

स्वर जरी मुके तुझे

स्वर जरी मुके तुझे
चेहऱ्यावरचे भावच बोलत होते,
माझ्यावरील निस्पृही प्रेमाची
तेच कबुली देत होते. 


ओठ जरी निशब्द तुझे
स्मित हास्य उमलत होते,
माझ्या डोळ्यातील प्रेमाची
तेच साक्ष देत होते.


शब्द जरी मुके तुझे
मनाची दालन उघडत होते,
तुझे चंचल अस्थिर मन
स्थिरतेची वाट पाहत होते.


तुझे रुसवे फुगणे
लटका राग दाखवीत होते,
माझ्याशिवाय तू अपूर्ण
नात्याची जाणीव करवत होते.


गालावरचे लाल रंग
लज्जेचे प्रतिक दाखवत होते,
सर्वस्वी माझी असल्याची
शाश्वती ते देत होते.


मी काही क्षणासाठी नसताना
डोळे तुझे पाणावले होते,
क्षणिक वियोगाच्या वेदना
तेच प्रकट करत होते.


तू काही न बोलतानाही
सारेच मला समजत होते,
तुझ्या उत्कंठ प्रेमानेच
माझे विश्व बनले होते.

Love cannot be hidden when its true...
The eyes spill the emotions...
The heart skips a beat...
The loved one gets the message, because
Love is in the air...

28 November 2010

बाळा

बाळा मला तुझी
खुप आठवण येत आहे,
दृष्टीसमोर सतत
तुझे प्रतिबिंब दिसत आहे.


तुझे गोजिरवाणे रूप
तनामनात सामावले आहे,
तुझ्या पायाचा झुनझुन आवाज
अजूनही कानात सादत आहे.


तुझे गोड स्मित हास्य
तुझ्या गालावरची खळी दाखवते,
तुझे खोटे रुसवे फुगवे
आठवून मलाही हसायला लावते.



तुझे लुटपूट चालण बागडण
घरही सुन्न झाले आहे,
बाळा तुला भेटण्यासाठी
मन माझे आक्रदंत आहे.


क्षणापुरता हा दुरावा असूनही
हृदय माझे घायाळ आहे,
पंख लावूनी भरारी घेत,
तुझ्या कुशीत बिलगायचे आहे.

A mother's heart is always full of love for the baby.

27 November 2010

खरच जीवन म्हणजे काय असतं?

खरच जीवन म्हणजे काय असतं?
अनुभवाची शिदोरी घेवून चालतं.


एका क्षणी आनंदाचे तुषार
दुसरीकडे सगळं आटत जाते
एकीकडे प्रेमाचा वर्षाव
दुसरीकडे ओझ्याची जाणीव होते.


सर्वत्र भिन्न अनुभव
खरं खोटं समजत नाही,
जगाची जाणीव होईपर्यंत
नशीबही साथ देत नाही.


नेमके बिघडले कुठे
हिशोबच लागत नाही,
विस्कटलेली घडी निस्तरायला
वेळ आणि इच्छा उरतच नाही.


हे असच का असतं
मनालाही पचत नाही,
कर्मभोग याच जन्मी
मनातली भिती जात नाही.


काही वेळ जीवनाचं
गणित समजत नाही,
पाप, पुण्य, धर्मं, कर्तव्य
कोडं सुटत  नाही.


खरच जीवन म्हणजे काय असतं?
अनुभवाची शिदोरी घेवून चालतं.


What is life- no one has the answer.
Its a journey full of different experiences.
Some are good, some you dont like & cant change.
Is there something called destiny?
Maybe 'experience' is the key to understand what is life.
Kiran

24 November 2010

विचित्र मन

खरच मन किती विचित्र असते
नवीन ठिकाणी गेलं कि ते बावरते,
एका क्षणी ते विक्षिप्त होते
दुसऱ्या क्षणी ते खुलायला लागते.








तीच सभोवार माणस असतानाही
सुरवातीला अनोळखी ठरवते ,
काही क्षण संपल्यानंतर
स्वता:लाही सदस्य समजायला लागते.


दुरवर निरिक्षण करताना
प्रत्येकाविषयी कुतुहल वाढत जाते,
सर्वाना पाहत पाहत काहीतरी
तर्कवितर्क करत असते.


सुरवातीच्या भेटीत
शब्द कसे पुसट होतात,
शेवटी निरोप घेताना
शब्द अपुरे पडतात.


काही वेळाचे ते सोबती
सप्तरंगी जीवन वाटते,
समारोप संपत असताना
पुढच्या कार्यक्रमाची वाट पाहते.

23 November 2010

घुसमट

खूप काही बोलायचे होते
ते मनातच राहून गेले,
शांत घटीकेची वाट बघत
ओठच नि:शब्द होऊन गेले.


तू भेटल्यानंतरचे स्वप्न
बघण्यापुर्वीच अंधुक झाले,
मधेच वावटळ आली नि
शरीरच गारठून गेले.


दुखापातीनंतरच्या वेदना
तुला सांगायचे विसरून गेले,
तुझ्या कुशीत विसावण्याचे
ठरवलेलेही विसरून गेले.


कधी कधी जाणीव होते
तुझ्यावर मी अवलंबून राहिले,
मागे वळून पहिले तर
माझे विश्वच नष्ट झाले.


दोष कोणाचाही नसताना,
वाईट क्षण येऊन गेले,
स्थिर असणाऱ्या घडीला
पुन्हा विस्कटून गेले.

20 November 2010

जीवनाचा अर्थ

जीवनाचा अर्थ काय आहे?
ओझे आहे कि अनमोल आहे?


काटेरी कुंपण ओलांडताना
न आडखळण्याचा प्रयत्न आहे,
जखमेवर फुंकर, सुखाची चव
चाखण्याचा खेळ आहे.


Life is a mystery,
and will always remain so...
It keeps bringing new experiences,
and one tries to keep learning about it.


पायवाटेवर चालताना
कधी आप्तीयांची साथ आहे,
कधी वाळवंटातून भरकटताना
स्वताःची सावली सोबत आहे.




नकळतपणे झालेल्या चुकांवर
उपाय उपलब्ध आहे,
प्रत्येक वेळी लागू पडणे
अपेक्षा व्यर्थ आहे.


न उलगडलेले हे कोडे
परमार्थात अंत आहे,
सत्य माहित असूनही
आत्मा मोहजालात आहे.


सरतेशेवटी कधीतरी
सत्य कवटाळने माहित असते,
जीवनाची वजाबाकी करताना
गुंतागुंत वाढतच जाते.


जीवनाचा अर्थ काय आहे?
ओझे आहे कि अनमोल आहे?

मैत्री

जीवनाच्या या प्रवाहात
सवंगडी हरवले जातात,
आठवणीही काही काळाने
पुसटश्या होवून जातात.


प्रत्येक टप्प्यात नवीन
नाती मिळत जातात,
भेटीअंती निखळ मैत्रीचे
क्षण टिकून रहातात.


सर्व मैत्रीमधून
अनुभवाचे बोल भेटतात,
प्रत्येक नात्यातून निराळ्या
जीवनाची भाषा समजावतात.


विचारांच्या भागीदाराने
उनसावलीचे वाटेकरी बनतात,
नात्यातला शुद्धपणा
टिकवण्याचा प्रयत्न करतात.


सुदैवी तोच ज्याला
खऱ्या मैत्रीचे हात मिळतात,
जीवनाच्या चढउतारावर
त्याच्यासाठी सावली बनतात.

10 November 2010

ममता

मन का उदास आहे
बाळा तुझाच आभास आहे,
दूर परदेशात देह जरी
श्वास तुझ्यात अडकला आहे.


तुझा वाढदिवस शुभ दिवस
मी खुप दूर आहे,
माझं सर्व जीवन
तुलाच अर्पण आहे.


'आई' शब्द ऐकण्यासाठी
कान माझा अधीर आहे,
काही क्षणांचा हा दुरावा
बाळा मी तुझीच आहे.


तुझे यश पाहण्यासाठी
डोळे माझे आसुसलेले आहेत,
तुझ्या प्रत्येक पायरीत
माझा हात पाठीशी आहे.


तू जे मला दिलंस
त्याचं मोल अनमोल आहे,
तू शिखरावर पोचण्यासाठी
बाळा माझी साथ आहे.

09 November 2010

कधी वाटत

कधी वाटत  लहान व्हाव
अगदी निरागस बाळ असाव,
सुंदर निष्पाप नयनानी
हे सप्तरंगी जग बघाव.

कधी वाटत पक्षी व्हाव
गगनात स्वैर उडत रहाव,
कधी इथे कधी तिथे
स्वच्छंदपणे जगत रहाव. 

कधी वाटत फुलपाखरू व्हाव
बेधुंदपणे बागेत बागडाव,
एका फुलावरून दुसऱ्या पाकळीवर
मधरस चाखत रहाव.

कधी वाटत मशीन व्हाव
क्षणात काम संपवून  टाकाव,
दुसऱ्याच्या कामी आलो
भावनेने गलबलुन जाव.

कधी वाटत माणूसच व्हाव
जीवनाला समजुन घ्याव,
अर्थ समजला कि  कृतीने
जन्माच सार्थक कराव.

08 November 2010

धागा

हलुवार  धागा नात्यातला
नकळतपणे  तुटला जातो,
विचारांच्या दडपणाने त्याला
अजुन कमजोर बनवतो.



ह्रदय दुखावतात, मने दुरावतात
धागा कोलमडू लागतो, 
कोण खरे कोण खोटे
विचारांती प्रशनच उरतो.


नात्यातली ओळख
जपण्यासाठी वेळच नसतो,
क्षणिक चूका विसरुनही
मोठेपणा हरतच जातो.


नात संपल्याच दु:ख
धागा तुटून जातो,
सत्य न पचल्याने
मने पोखरुन काढतो.